
तुरीच्या शेतात गांजा लागवड करून शेतकऱ्याचा बक्कळ कमाईचा डाव फसला. छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री तालुक्यातील लालवन शिवारात पोलिसांनी मोठी कारवाई केली. यामध्ये गांजाची १ क्विंटल ५ किलो वजनाची १४१ झाडे जप्त करण्यात आली. याप्रकरणी ६६ वर्षीय चैनसिंग रतनसिंग बिमरोटे यांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून ५२ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांमार्फत ताब्यात घेण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
झटपट श्रीमंत होण्याच्या नादात फुलंब्री तालुक्यातील लालवन शिवारात शेतकऱ्याने तुरीच्या शेतात गांजाची लागवड केली होती. पाडळी एकफाटा शिवारातील गट क्रमांक २८ मध्ये गांजाची लागवड झाल्याची माहिती पिशोर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी थेट कारवाई करत गांजा शेतीचा भांडाफोड केला. तेव्हा शेतात गांजाची १४१ झाडे आढळली.
