मान्सूनने राज्य व्यापले; पुढील पाच दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता, काही भागांना ‘ऑरेंज अलर्ट’

मुंबई, ता. १९ (प्रतिनिधी) – नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अखेर संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून, राज्यात सर्वदूर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील पाच दिवस राज्यभर चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विशेषतः रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करत नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून अनेक भागांत धुवाधार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी पावसाने उसंत घेतली असली तरी बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोर कायम आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, मान्सूनने महाराष्ट्राचा संपूर्ण भूभाग व्यापला. साधारणपणे १५ ते १६ जूनदरम्यान राज्यात मान्सून पोहोचतो, यंदाही तो वेळेवर दाखल झाला आहे.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील बहुतांश भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. या पावसामुळे शेतीला दिलासा मिळण्याची चिन्हं असून, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र घाटमाथ्याच्या परिसरात आणि कोकणातील काही भागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा विभागांत सध्या पावसाचा जोर अधिक असल्याने, या भागातील नागरिकांनी पुराच्या संभाव्य धोका लक्षात घेऊन आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, यंदा केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर गुजरातचा बहुतांश भाग, झारखंड आणि बिहारपर्यंतही मौसमी वाऱ्यांनी मजल मारली आहे. यामुळे संपूर्ण पश्चिम व उत्तर भारतातही मान्सून सक्रिय झाला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top