पावसाचा कहर! पुण्याला ‘रेड अलर्ट’; मुंबई-कोकणात मुसळधार पावसाची शक्यता, किनारपट्टीवर उंच लाटांचा इशारा

मुंबई/पुणे, १९ जून:
राज्यात मान्सून पूर्णतः सक्रीय झाला असून, कोकण, मुंबई आणि पुणे परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’, तर मुंबई, रायगड, रत्नागिरी, सातारा घाट परिसरासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. पुढील २४ तास अत्यंत महत्वाचे मानले जात असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून कोकणसह घाटमाथ्यांवर पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. बुधवारी रात्रीपासून पुणे व मुंबई शहरात मुसळधार पावसाने झोडपले असून, पुण्यात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही भागांत घरातही पाणी शिरल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

किनारपट्टी भागांना उंच लाटांचा धोका

मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत समुद्रात ३.५ ते ३.८ मीटर उंच लाटांची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 18 जून रोजी रात्री ११.३० वाजेपर्यंत या भागात किनारपट्टीवरील नागरिकांनी विशेष सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

नद्या धोक्याच्या पातळीवर

रायगड जिल्ह्यातही मुसळधार पावसाची संततधार सुरु असून अंबा आणि कुंडलिका नद्यांनी धोक्याची आणि इशारा पातळी ओलांडली आहे. खोपोली-वाकण मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली असून पोलिसांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत.

मराठवाडा-विदर्भातही पावसाचा इशारा

केवळ कोकण व घाटमाथाच नव्हे, तर मराठवाडा आणि विदर्भातही विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून सक्रीय झाल्यामुळे पुढील काही दिवस नागरिकांसाठी निर्णायक ठरणार आहेत.

प्रशासन सज्ज, नागरिकांनी खबरदारी घ्यावी

पुणे जिल्हा प्रशासनासह सर्व संबंधित यंत्रणा सतर्क असून, नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, नद्या-नाल्यांच्या आसपास जाऊ नये आणि अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top