Pune : सोन्याची चैन चोरल्याप्रकरणी एकास अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जीवे मारण्याची धमकी देऊन गळ्यातील ३५ हजार रुपये किमतीची सोन्याचे चैन चोरल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी एका सराईताला अटक केली. न्यायालयाने त्याला १२ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला आहे.

सागर शिरवाळे (वय २२) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. याबाबत २३ वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. सात एप्रिल रोजी मुंबई-बंगलोर महामार्गावर ही घटना घडली. फिर्यादी हे वडगाव येथे मुंबई-बंगलोर महामार्गावर गावी जाण्यासाठी थांबले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्या गळ्यातील ११ ग्रॅम वजनाची ३५ हजार रुपयांची चैन जबरदस्तीने काढून घेतली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी शिरवाले याला न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्यातील चैन हस्तगत करायची आहे. गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीबाबत त्यांच्याकडे तपास करायचा आहे. त्यांचा आणखी कोणी साथीदार आहे का? त्यांनी अशा प्रकारे आणखी गुन्हे केले आहेत का?, याचा तपास करण्यासाठी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकीलांनी केली.