Pune : सिंहगड रोडच्या स्वयंघोषित ‘भाई’चा तुफान ‘राडा’; ऑफिससह 6 वाहनांची तोडफोड, पोलिसांकडून कठोर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सिंहगड रोडच्या स्वयंघोषित भाईला दुकानासमोर थुंकल्याचा जाब विचरल्याच्यानंतर या भाईने साथीदाराच्या मदतीने तुफान राडा घालत ऑफिसची तर तोडफोड केलीच; पण तिघांना मारहाण करत पार्क केलेल्या 6 वाहनांची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. बुधवारीच्या भरदुपारी माणिकबाग परिसरात ही घटना घडली आहे.

याप्रकरणी करण दळवी याच्यासह दोघांवर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हनुमान मोरे (वय 29) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची विक्रांत पॅलेस येथे आय.बी. आटोमेशन इंजिनिअरिंग प्रोजेक्ट प्रा.ली. कंपनी आहे. बुधवारी दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास करण दळवी हा फिर्यादी यांच्या कंपनी समोर येऊन त्यांच्या पायरीवर बसला होता. त्यावेळी तो पायरीवर थुंकत होता.

याचवेळी फिर्यादी हे बाहेर आले असता त्यावेळी आरोपी थुंकत होते. त्यामुळे त्यांनी थुंकू नका, सध्या कोरोनाचा काळ आहे. संसर्ग होऊ शकतो, असे म्हणत त्याला जाब विचारला.

त्यावेळी करण दळवी याने “तू मला ओळखत नाहीस का, तू कोणाशी बोलतोय, तुला कळत नाही का, मी करण दळवी सिंहगड रोडचा भाई आहे, तुला संपवून टाकेन. असे म्हणत धमकावले. यावेळी त्यांच्यात वाद सुरू झोले. त्याने हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. तर बाजूला पडलेला दगड उचलून डोक्यात घातला. पण त्यांनी तो चुकवला. तो दगड फिर्यादी यांच्या ऑफिसच्या काचावर बसला. त्यानंतर फिर्यादी यांचे सहकारी आले असता त्यांना देखील करण व त्याच्या साथीदारांने शिवीगाळ करत मारहाण केली. तर ऑफिसमध्ये घुसून तोडफोड केली. त्यानंतर राडा घालत बाहेर पार्क केलेल्या 6 वाहनांची तोडफोड करून दहशत माजवली. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत. परिस्थिती नियंत्रणात आणली. अधिक तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.