Pune : हडपसर परिसरात भर रस्त्यात पत्नीचा चाकूने सपासप वार करत खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कौटुंबिक कारणावरून भर रस्त्यात पत्नीचा निर्घृणपणे चाकूने वार करत खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हडपसर येथील भेकराईनगरमध्ये बुधवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. शुभांगी सागर लोखंडे (वय 21) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सागर बाळू लोखंडे (वय 23) याला पकडले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर व शुभांगी यांचा एक वर्षांपूर्वी विवाह झाला होता. उरुळी देवाची येथे दोघे राहत होते. सागर हा व्यसनांच्या आहारी गेला होता. तो सतत दारू व गांजा पीत असे. त्याच्या या स्वभावाला कंटाळून शुभांगी वारंवार माहेरी जात होती. आजही शुभांगी भांडणाला कंटाळून माहेरी आली होती. त्यानंतर ती आज सकाळच्या सुमारास कामावर जात होती. यावेळी पती सागरने तिला रस्त्यात गाठले व घरी येण्यास सांगितले. पण, शुभांगी घरी येण्यास नकार दिला. याचा राग आल्याने सागरने रस्त्यातच वाद घालण्यास सुरुवात केली. दोघांचे भांडण सुरू झाल्यानंतर सागरने रागाच्या भरात शुभांगी यांच्यावर चाकूने सपासप वार केले. त्यांच्या पोटावर सपासप वार करण्यात आले आहेत. यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यामुळे शुभांगी या भर रस्त्यात रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या.

भल्या सकाळी अन गर्दीच्या वेळीच हा प्रकार घडल्याने एकच गोंधळ उडाला होता. दरम्यान माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शुभांगी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पण, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. हडपसर पोलिसांनी सागरला अटक केली आहे.