फोटोबाबत मनसेचा शिवसेनेला सवाल

मुंबई :   पोलीसनामा ऑनलाइन –  सध्या राज्यात कोरोना संसर्गाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यातही मुंबईत कोरोना संसर्गित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत असल्याचं दिसत आहे. अशा स्थितीमध्ये राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटना जनतेच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरत आहे. मात्र, काही ठिकाणी या गोष्टीची जाहिरातबाजी होत असल्याचं दिसून येत आहे. यावरून आता मनसेनं शिवसेनेवरती निशाणा साधला आहे.

शिवसेनेकडून कुलाबा परिसरात महिलांसाठी ५०० सॅनिटरी पॅड्सचं वाटप करण्यात आलं. परंतु, या मदत साहित्यामधील सॅनिटरी पॅडवरती पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा फोटो छापण्यात आला होता. युवती आणि युवा सेनेकडून गरजूंसाठी या सॅनिटरी पॅडचं वाटप करण्यात आलं होत. पण याचे फोटो काही वेळात सोशल मीडियात मोठ्या प्रमाणत पसरल्यानंतर आदित्य ठाकरेंवरती सर्व स्तरातून टीका होत होती. यावर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटवरून टीका केली आहे.

‘हे फोटो देखील आदीच छापले होते का? कशावर कोणाचा फोटो टाकायचा कळत नाही का, असा सवाल देशपांडे यांनी उपस्थित केला. तसेच आता म्हणतील राजकारण नको, असा टोला देखील संदीप देशापांडे यांनी शिवसेनेला लगावला.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती गरजू लोकांना मदत देताना फोटो किंवा व्हिडिओ काढून त्याला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी न देण्याचे आवाहन केले होते. कॅमेऱ्याकडे पाहून मदतकार्याची छायाचित्र काढणं, मदत स्वीकारणाऱ्यास कॅमेऱ्यात पाहायला सांगणं अशा चुकीच्या गोष्टी लोक करत आहेत. ज्याला आपण मदत करत आहोत त्याचा चेहरा दाखवून आपण त्याला लावजत नाही का? असं करून एखाद्याला शरमेनं मान खाली घालायला लावणं कितपत योग्य आहे,’ असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला होता.