Coronavirus : राजकारणी आरोप-प्रत्यारोपात मश्गूल ! पालिकेचे 48 कर्मचारी ‘कोरोना’बाधित तर 5 जणांचा मृत्यू, पोलिस दलातील 22 जणांना लागण तर दोघांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑलनाइन – महापालिकेच्या तब्बल ४८ कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले असून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर शहर पोलिस दलातील २२ कर्मचारी बाधित झाले असून त्यापैकी २ जणांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे शहरातील सत्ताधारी व र विरोधी पक्षांमध्ये कोरोना विरोधातील यश अपयशावरून आरोप प्रत्यारोप सुरू असताना प्रशासनाची कोरोना विरोधातील लढाईची धार बोथट केली जात असल्याने पालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि प्रत्यक्षात रस्त्यावर काम करणार्‍या पोलिसांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

देशात जानेवारी महिन्यांत कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याचा अलर्ट मिळाल्यानंतर महापालिकेची आरोग्य यंत्रणा सजग झाली. शहरातील एकमेव संसर्गजन्य आजारावरील उपचाराचे रुग्णालय असलेल्या नायडू हॉस्पीटलमध्ये सर्व यंत्रणा अलर्ट करण्यात आली. यानंतर मार्चमध्ये पुण्यातच परदेशातून आलेल्या एका कुटुंबातील दोन जण पॉझीटीव्ह आढळल्यानंतर पालिकेच्या आरोग्य यंत्रणेसोबतच सर्व विभागातील यंत्रणेची मोट बांधण्यात आली. अगदी कोरोना बाधित आढळले त्या ठिकाणच्या तीन कि.मी. परिसरातील नागरिकांचे सर्वेक्षण आणि माहिती गोळा करण्याचे काम शिक्षक आणि परिचारीकांना देण्यात आले. राज्यात रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर राज्य शासनाने हळूहळू सार्वजनिक ठिकाणे बंद करण्यासोबतच संचारबंदी लागू केली. २५ मार्चला तर संपुर्ण देशातच लॉकडाउन करण्यात आले.

यानंतरही शासन आदेशानुसार कार्यालयातील पाच टक्के उपस्थिती वगळता शहरातील स्वच्छता, आरोग्य, कचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा, अग्निशामक दल, हॉस्पीटल्स अशा प्रत्येक ठिकाणची यंत्रणा पुर्णत: रस्त्यावर उतरविण्यात आली आहे. तर लॉकडाउन आणि संचारबंदीचे काटेकोर पालन व्हावे आणि संसर्ग वाढू नये यासाठी आरोग्य विभागाच्या गाईडलाईन्सचे पालन करण्यासाठी पोलिसही नाकाबंदीसाठी अहोरात्र रस्त्यावर उभे ठाकले आहेत.

कोरोनाची लक्षणे समजण्यास उशिर होत असल्याने सुरक्षिततेचे उपाय योजूनही शहराच्या सर्वच भागात अत्यावश्यक सुविधा पुरविणार्‍यां कर्मचार्‍यांनाही कोरोनाची लागण होत असल्याचे समोर येत आहे. तर काही ठिकाणी निष्काळजीपणाही समोर येतोय. आतापर्यंत महापालिकेच्या ४८ कर्मचार्‍यांना कोरोनाची बाधा झाली आहे. सफाई कर्मचारी, शिपाई, बिगारी, लिपिक, बहुद्देशीय कामगार, आरोग्य निरीक्षक, वाहन चालक, बालवाडी शिक्षिका आणि नर्सेसचा समावेश आहे. यापैकी  ३७ कर्मचारी हे महापालिकेच्या कायम सेवेतील असून ११ कर्मचारी कंत्राटी आहेत. दुर्देवाने आतापर्यंत ५ महिला कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला असून त्यापैकी ४ सफाई कर्मचारी असून एक आया आहेत. उर्वरीत ४३ कर्मचार्‍यांपैकी २४ कर्मचारी बरे झाल्यानंतर रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर १९ जणांवर उपचार सुरू आहेत.

पुणे पोलिस दलातही २२ कर्मचार्‍यांना कोरोनाची बाधा झाली आहे. दोन आठवड्यांपुर्वी एका सहाय्यक फौजदाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तर आज वाहतूक शाखेतील एका कर्मचार्‍याचे निधन झाले आहे.

कोरोना विरोधातील लढ्यातील ही प्रत्यक्षात बॅटलङ्गिल्ड असली तरी राजकिय पातळीवर मात्र वातावरण वेगळेच आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात सत्ताधारी आणि प्रशासन अपयशी ठरल्याचा ठपका विरोधी पक्ष आणि पालिकेतील सत्ताधारीही ठेउ लागले आहेत.  सलग ६० दिवसांपासून सर्वच विभागातील अधिकारी आणि कर्मचारी आरोग्य सुविधा निर्माण करण्यापासून अगदी क्वारंटाईन केलेल्या हजारो नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करत आहेत. परंतू प्रत्येकच भागातून स्थानीक पातळीवरील लोक प्रतिनिधींचा तसेच राजकिय कार्यकर्त्यांचा सातत्याने दबाव झेलावा लागत असल्याने, वरून आरोप होउ लागल्याने अधिकारी आणि कर्मचार्‍यांमधील नाराजी वाढू लागली आहे. अक्षरश: काही कर्मचार्‍यांनी व अधिकार्‍यांनी अगदी वरिष्ठ अधिकार्‍यांपर्यंत राजकिय कार्यकर्त्यांकडून मिळणार्‍या अपमानास्पद वागणुकीबाबत खंतही बोलून दाखविली आहे. अशीच परिस्थिती राहील्यास आगामी काळात कोरोना विरोधातला लढा कसा लढला जाणार? याबद्दल भिती व्यक्त करण्यात येउ लागली आहे.